Asset side:

  • Posts 134
  • Comments 118
  • Words in Posts 19,774
  • Words in Pages 947
  • Words in Comments 1,549

> Visits:

Visits So far..

Archives

Clocky: Clock Widget

Get Adobe Flash player Wordpress Plugin By California Accountant
?
PageRank

माझ्या आवडत्या कविता -१

इतके वर्षातल्या आवडलेल्या आणि भावलेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठांच्या कविता इथे एकत्रित करत आहे…थोड्या थोड्या रसग्रहणासकट… मला ही उजाळा / नवे शोध आणि तुम्हालाही आनंद..

किंमत

बोलू नये: मिटल्या डोळ्यांनी सांगावे पाण्यापाशी
बुडून जावे आपणच आपल्या अबोलपणात,
शपथ घालू नये कासाविशीने श्वास बांधीत
आपल्याच प्राणात ठेवावी आपली दिवेलागण
.
झाडावरचे पाखरू दूरचे वळण पाहील
उडून जाईल आपणच एक वळण होऊन
त्याच्यापाशी द्यावी मनातली सोनजांभळी संध्याकाळ
काळोखाचे रान खोल खोल भरुन येण्याआधी
.
सांगू नये कुठल्याही क्षणावर हक्क आपला,
बांधू नये पाखराचा पाय कधी फांदीला
हातात हात गुंफून चालत असताना
होऊ नये आपण कुणाभोवतीचा पिंजरा
.
चांदण्यात गाव बुडेल तेव्हा एकटे असावे
थांबू नये झाडांची गळून गेलेली पाने मोजीत
एकटेपणा हीच खूण असते उत्कट जगण्याची
मोजू नये आपल्या गाण्यासाठी दिलेली अटळ किंमत
.
मंगेश पाडगावकर ०८-०६-१९६९

.
कविवर्य पाडगावकर अर्थातच माझे सर्वात आवडते कवी आहेत. म्हणून त्यांची एक अगदी शाळकरी वयात वाचलेली आणि मनात ठसलेली कविता इथे उध्दृत करत आहे. एकटेपणा, मनस्वीपणा, मनातला जिप्सी, इ त्यांच्या कवितेत नेहमीच आल्या आहेत. याच संदर्भात बसणारी पण तरीही अर्थाप्रमाणेच शब्दप्रयोग व लय याबाबतही अप्रतिम असणारी ही कविता आहे. जवळपास ४० वर्षांपूर्वीची.. ही रूढ अर्थाने वृत्तातली रचना नाही. तसेच यमक नाही व अक्षर व मात्रांचेही बंधन नाही. पण तरीही हा ‘मुक्तछंद’ नाही.
.
कवितेला एक विलक्षण लय आहे.. सलग वाचत जाल तर शेवटाला चकित व्हायला होतं..आणि एकांतात आठवाल तर डोळ्यात पाणी येतं.. पाखराचा पाय फांदीला बांधणं, काळोखाचं रान भरुन येणं, चांदण्यात बुडणारं गाव, “झाडावरचे पाखरू दूरचे वळण पाहील; उडून जाईल आपणच एक वळण होऊन” सारखी अफलातून कल्पना, ‘मिटल्या डोळ्यांनी सांगावे पाण्यापाशी’ मधले अदृश्य अश्रू, अशा एकाहून एक अप्रतिम शब्दरचना यात आहेत..
.
.
अर्थाच्या संदर्भात - तिचं सोडून जाणं, किंवा सर्वसाधारण एकटेपणा या दोन्ही संदर्भात ही कविता वाचता येते. तिला अडवायचं तर नाहीये..पण सहन होत नाहीये..म्हणूनच आपली दिवेलागण आपल्याच प्राणात ठेवायची..शपथ घालायची नाही.. पण संध्याकाळ होता होता तिचं जाणं अधिक जवळ येतंय, बोचरं होतंय..त्यातूनच - “होऊ नये आपण कुणाभोवतीचा पिंजरा” आणि “बांधू नये पाखराचा पाय कधी फांदीला” या ओळी येतात. आणि मग संध्याकाळ होते…रात्र बुड्ते तेव्हा - “चांदण्यात गाव बुडेल तेव्हा एकटे असावे” अशी उत्कट ओळ येते.. त्या अर्थाने ही प्रेम कविता आहे. पहिल्या ओळीतील अश्रूंचा उल्लेख ही भावना अधिक गडद करतो.
.
पण विरहाची छटा बाजूला ठेवली तरीही या कवितेत एकूणच आयुष्यातील अपरिहार्य वियोग विलक्षण पध्दतीने मांडला आहे. लोक भेटतात, लळा लावतात आणि काही कारणाने दूर जातात…भांडण वगैरे झाले नसले तरीही आयुष्याचा प्रवास सर्व काळ त्यांना आसपास राहू देत नाही..जुने सुह्रुद, एकत्र काम केलेले सहकारी, जिवाभावाचे शेजारी….सगळे out of contact जातात…इच्छा असूनही आपण त्यांच्याबरोबर काळ घालवू शकत नाही…आणि अप्रिय लोकच पुन्हा पुन्हा भेटत राहतात..मग आपल्यालाच वाटतं…काय हक्क आहे आपला आपल्याच अशा आयुष्यावर…?
.
कधी आपण ज्यांना हक्काचे समजतो ते लोक आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत…आपले प्रश्न त्यांनी सोडवणे दूरच पण एकेकाळी आपल्यावरच संपूर्ण अवलंबून असणारे ते लोकही त्यांचे नवे प्रश्न आणि त्यांचे नवे उत्सव आपल्याविना भोगतात…तेव्हा खरेच विफलता वाटते..काय हक्क आहे आपला त्यांच्या आयुष्यावर…? उत्तर एकच – काहीच नाही…हक्क नसतोच…अगदी आईवडिलांचाही नसतो… ज्याचा जितका शेर तितका तो आपला…बाकीचा तो मुक्त पक्षी…
.
“शपथ घालू नये कासाविशीने श्वास बांधीत आपल्याच प्राणात ठेवावी आपली दिवेलागण.” तुम्ही दिलंत ते तुमचं सोनं…त्यानं त्याचं काय केलं ते तुम्ही पाहू नका..तुमची उत्कटता तुमच्या जगण्यात दिसली..देण्यात दिसली..त्याचे मग काहीही होवो…कुणी कदर करो ना करो..कधी बरोबर दान पडेल तर कधी समोरचा सगळे सगळे विसरून जाईल…कधी ज्यांच्याशी सूर जुळताय्त असे वाटेल तेच लोक चार दोन महिन्यात पार कुठे हरवून जातील..तुम्ही काहीच करु शकत नाही..तुम्हापाशी फक्त अस्वस्थता…तुम्हीच पत्करलं होतंत हे देण्याचं संवेदनशील जिणं…म्हणूनच ही अस्वस्थता………….तुमच्या वाट्याला………..
.
“चांदण्यात गाव बुडेल तेव्हा एकटे असावे
थांबू नये झाडांची गळून गेलेली पाने मोजीत
एकटेपणा हीच खूण असते उत्कट जगण्याची
मोजू नये आपल्या गाण्यासाठी दिलेली अटळ किंमत.”
.
आयुष्यभर पुरेल अशी एक कविता दिल्याबद्दल कविवर्यांना लक्ष लक्ष धन्यवाद..

2 comments to माझ्या आवडत्या कविता -१

  • Mangesh Nabar

    khoopach aanand vatalaa. dhanyavaad. asech paathavaa.

  • prachi

    Manapasoon dhanyawaad… he kavita ithe post kelyabaddal..aani yavishayeecha tujha aakalan samjaavun saangitalyaabaddal..
    Aata waeet ya goshteecha waatatay ki aadhi ka vachali navatee hee kavita…
    atta je kahee samajalay tyapexa kahee varshanmaage je samajala asata, tar phaar bara jhala asata..
    aso…khoop chhan kavita aani tujha rasgrahan hee…lihit raha.

Leave a Reply

 

 

 

You can use these HTML tags

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>