————————————-
(दिवसाची सर्व कामे संपवल्यावर संध्याकाळी ऑफिस मध्ये आवराआवर करतानाचा तो मूड..त्यात आहे – घरी जाण्याची घाई, काही कामाचा उरक, आणि शेवटी टिफिन बॉक्स बरोबर येणारी ‘तिची’ आठवण, या सगळ्याचं टिपण बनतं ते मग असं…)
—>
कामे संपवता संपवता, उरली थोडी कसकस
कागदपत्रांच्या ओळी मात्र शिस्तीत, नीटस
.
कामे संपवता संपवता शहारली बोटे थोडी,
सुन्न मेंदूच्या डोक्यात, वाटा काही नागमोडी
.
कामे संपवता संपवता, राहिलं इथे तिथे काही
मनाच्या त्या राखणीला, कोण आलं कोण नाही
.
कामे संपवता संपवता, रात्र चढतच चालली
शून्ये चंद्राच्या आकड्यावरची पुन्हा मोजून पाहिली
.
कामे संपवता संपवता, भेटे सखा आता कोण
उरे रस्त्याच्या वाटेला सरळ रेषांचा त्रिकोण
.
कामे संपवता संपवता डोळे हे का चुरचुरले
कडी वाजत्या डब्यातून, पहा चांदणे भुरभुरले…


छान आहे कविता
खूप छान रचना…….!!
Chaaaaaan.