आजकाल माझ्या कवितेत रिकाम्या जागाच फार
…
तशी बांधलेल्या अक्षरांची उडण्याची खोड जुनीच…
राहिली काही काळ जरी माझ्यापाशी
तरी ओढ त्यांना कायमच निळ्या आकाशाची
बागेतल्या फुलपाखराची, बोटीतल्या हेलकाव्यांची…
.
आतून आलेल्या हाकांनी,
निसर्ग जेव्हा हिरवा फुलतो,
ओल्या गवताच्या वासासकट…
तेव्हा ही अक्षरे त्याचे दव टिपायला जातात
.
छान कलत्या उन्हात जेव्हा,
डोंगर वेश बदलून येतात,
सांसारिकाच्या संध्याकाळसारखे…
तेव्हा ही अक्षरे त्यांची रात्र फुलवायला जातात
.
तिच्या मनची भोळी आठवण,
जेव्हा पापणी आडून ओघळते,
ओठात दाबल्या हुंदक्याला न जुमानता…
तेव्हा ही अक्षरे तिची गोष्ट पुरी करायला जातात
.
अशी ही आभाळवेडी अक्षरे आता
मुक्त शांतता देतात सगळ्या मनाला…
अत्तर उडून गेल्यावर भरजरी वस्त्राला
जाणवणाऱ्या मंद दरवळीसारखी…
.
ही माझी भूतकाळातून सुगंधी असणारी अक्षरे
.
ही बहुतेक कधीकाळी माझी असणारी अक्षरे
.
ही आता अशीच कुठे कुठे नांदायला गेलेली अक्षरे
.
.
.
.


खूप छान लिहिलयस…कळतात रिकाम्या जागा. त्याही छानच,पण गोष्ट पूर्ण होउ दे…
शेवटी म्हटलं आहेस, तशी मुक्त शांतता..ती आहे कवितेत…सुंदर.
Touched me! Really! I used to silently follow your poetry without commenting. But this one urged me to respond.
आजकाल माझ्या कवितेत रिकाम्या जागाच फार !
faarch chhan
Sundar aahet shabda! tya tya arthacha anubhav manala denare..